राष्ट्रीय पेयजल योजनेत 70 लाखांचा भ्रष्टाचार मंठाच्या तहसीलदारांसह 29 जणांवर गुन्हे दाखल
प वृत्तसंस्था
जालना
राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या जागेत मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात शेतीमध्ये विहीर घेतल्याचे दाखवण्यात आले. यातून शासनाला 70 लाख रुपयांना चुना लावणार्‍या मंठाच्या तहसीलदारांसह 29 जणांवर न्यायालयाच्या आदेशान्वये मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तहसीलदारापासून अभियंते, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य अशा 29 जणांचा यामध्ये समावेश आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मोहन बाळासाहेब वायाळ (रा. पांगरी बु.) यांनी 2016 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी त्यांच्या मालकीची दोन गुंठे जमीन ग्रामपंचायतीला दान केली होती. या शेतजमिनीच्या बाजूलाच अन्य नातेवाईकांच्या शेत जमिनी आहेत. या शेतजमिनीमध्ये तीन विहिरी देखील आहेत.
मात्र, शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींनी संगनमत करून दान दिलेल्या दोन गुंठे जमिनीमध्ये विहीर घेतल्याचे शासनाला सांगून त्याची रक्कम उचलली. प्रत्यक्षात मात्र आजही याठिकाणी विहीर नाही. याप्रकरणी तक्रारदार मोहन बालासाहेब वायाळ यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या परिसरामध्ये चार नव्हे तर तीनच विहिरी असल्याचे यात म्हटले होते. या तक्रारीची शहानिशा करून उपविभागीय अधिकार्‍यांनी देखील तीनच विहिरी असल्याचा अहवाल शासनाला दिला होता. दरम्यानच्या काळात हे प्रकरण दाबण्यासाठी मोहन वायाळ यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.