मुंबईतील शिक्षणोत्सव स्थगित करावा

मुंबई ः येत्या 16 ते 17 मार्च रोजी मुंबईत शालेय शिक्षण विभागातर्फे होणारा शिक्षणोत्सव स्थगित करण्यात यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने शिक्षण विभागाकडे केली आहे. कोरोना विषाणू बाबत सतर्कता बाळगावी यासाठी हा शिक्षणोत्सव स्थगित करण्याबाबत भाजपा शिक्षक आघाडी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत शैक्षणिक गुणवत्तवाढीसाठी मुंबईत 16 व 17 मार्च रोजी अंधेरीतील चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर येथे हा शिक्षणोत्सव होणार आहे. मुंबईतील महानगरपालिका शाळा व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर, पश्‍चिम व दक्षिण विभागातील खासगी शाळांमधील शेकडो शिक्षक, शिक्षणप्रेमी व पालक ह्या शिक्षणोत्सवाला भेट देण्याची शक्यता आहे.  दरम्यान, सध्या करोना विषाणू पसरू नये यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात असून गर्दी होणारे कार्यक्रम व उपक्रम पुढे ढकलले जात आहे. त्याप्रमाणेच हा शिक्षणोत्सव स्थगित करून पुढील शैक्षणिक वर्षात घेण्यात यावा असेही आघाडीच्या अनिल बोरनारे यांनी पत्रात म्हटले आहे.